शिर्डी नगरपंचायतची शिर्डी नगरपरिषद व्हावी यासाठी भाजप नेते शिवाजी गोंदकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 2018 साली नगरपरिषद करण्याचे आदेश शासनास दिले होते. मात्र, आजतायागत शिर्डी नगरपरिषद झाली नसून अद्याप नगरपंचायतच आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे गोंदकर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली असून यावर 7 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. 7 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. यामुळे शिर्डीतील सर्व पक्षीय नेत्यांनी या नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
शिर्डी (अहमदनगर) – नगरपंचायतची शिर्डी नगरपरिषद व्हावी यासाठी यापूर्वी भाजप नेते शिवाजी गोंदकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी येत्या 7 डिसेंबरला होणार आहे. नेमकी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटची तारिखही 7 डिसेंबरपर्यंतच असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहीष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.
21 डिसेंबरला होणाऱ्या शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे शिर्डीच्या लोकसंख्येच्या आधारावर नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद करावे, यासाठी 2016 सालीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल करण्यात आली होती. त्यात 2018 शासनास नगरपरिषद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नगरपरिषद न झाल्याने शिर्डीतील शिवाजी गोंदकर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी 7 डिसेंबरला होणार आहे. त्यात शासनाने शिर्डी नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत आजपासून ते सात डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यात उच्च न्यायालयाने पुन्हा नगरपरिषद करण्याचे आदेश दिल्यानंतर काही महिन्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहीष्कार टाकण्याचा निर्णय शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.