Breaking
28 Oct 2025, Tue

“परिपूर्णतेच्या शोधात रिकामेपणा”

एका संध्याकाळी, सूर्य मावळतीकडे झुकत होता. आकाशात लालसर छटा पसरल्या होत्या.एक तरुण अचानक आपल्या वडिलांना विचारतो –“बाबा… खरं प्रेम म्हणजे नेमकं काय?”वडिलांनी क्षणभर आकाशाकडे पाहिलं, मग हळूच आपल्या सफरचंदाच्या बागेकडे बोट दाखवलं आणि म्हणाले –
“जा रे बाळा, या बागेतून सर्वात मोठं, टवटवीत आणि सुंदर सफरचंद घेऊन ये. पण लक्षात ठेव… मागे वळायचं नाही. एकदा एखादं झाड सोडलं, की ते कायमचं मागे राहतं.”मुलगा बागेत शिरला.
पहिल्याच झाडावर त्याला एक चकचकीत, आकर्षक सफरचंद दिसलं. क्षणभर तो थांबला, पण मग विचार केला – “हे ठीक आहे, पण कदाचित पुढे अजून उत्तम मिळेल.”थोडं पुढे गेला. त्याला आणखी मोठं, लालसर सफरचंद दिसलं. पण पुन्हा मनात तोच विचार – “नाही, अजून वाट बघतो.”अशीच त्याची पावलं पुढे सरकत राहिली.
शेवटी जेव्हा तो बागेच्या टोकाला पोहोचला, तिथली सफरचंद मात्र डागाळलेली, कोमेजलेली होती.
त्याच्या हातात… काहीच आलं नाही.तो निराश होऊन वडिलांकडे परतला.

वडिलांनी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले –
“बाळा, हेच प्रेम आहे. आपण सुरुवातीला जे चांगलं मिळतं, त्याला कमी लेखून सतत ‘याहून अजून काहीतरी परिपूर्ण मिळेल’ या हव्यासाने पुढे चालत राहतो. पण परिपूर्णतेच्या शोधात खऱ्या सौंदर्याची संधी गमावून बसतो… आणि शेवटी हातात रिकामेपणा उरतो.”मुलगा थोडा स्तब्ध झाला. विचारांच्या गर्तेत तो हरवून गेला. मग त्याने पुन्हा विचारलं –
“मग बाबा… लग्न म्हणजे काय?”वडिलांच्या चेहऱ्यावर गूढ स्मित उमटलं. त्यांनी मक्याच्या शेताकडे बोट दाखवलं –
“जा, या वेळी शेतातून एकदम उत्तम कणीस घेऊन ये. नियम तोच – मागे वळायचं नाही.”

मुलगा सावधपणे शेतात उतरला.
या वेळी त्याने पहिल्या काही कणसांकडे बारकाईने पाहिलं.
आणि काही अंतरावर त्याला एक सोनेरी, भरगच्च आणि देखणं कणीस दिसलं.
त्याने लगेच ते तोडलं आणि वडिलांकडे आणलं.वडील हसले आणि म्हणाले –
“हेच लग्न आहे बाळा. लग्न म्हणजे परिपूर्ण व्यक्ती शोधणं नाही; तर योग्य जोडीदार निवडून त्याच्यात समाधान मानणं आहे.
प्रेमात आपण हव्यासाने रिकामे होतो, पण विवाहात योग्य निवड आणि स्वीकाराने आयुष्य समृद्ध होतं.
खरं सुख शोधण्यात नाही, तर मिळालेल्या सुखाला ओळखण्यात आहे.”

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *