मुंबई – मुंबईतील ड्रग्स प्रकरणाच्या (drug case) थेट संबंध आता कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात असणाऱ्या ढोलगरवाडी गावापर्यंत पोहोचला आहे. ढोलगरवाडी गावात एका फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. यावेळी तब्बल 2 कोटी 35 लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.ड्रग्सचं लोण आता खेडेगावापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकरणात एका मोठ्या वकिलाचा मुख्य आरोपी म्हणून सहभागी असून तो फरार आहे. तर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील ढोलगरवाडीतील एका फार्महाऊसवर पशुपालनाच्या आड एमडी नावाचा ड्रग्स तयार करण्याचा कारखाना सुरू होता. त्याची विक्री मुंबईसह इतर भागात केली जात होती, ही माहिती उघडकीस आली आहे. संबंधित कारवाईबाबत पोलिसांनी सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता बाळगली होती. तीन दिवस झडती घेतल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अलीकडेच, मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसवर एमडी नावाचा अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी ढोलगरवाडी येथील संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकला. त्यानंतर तिच्याकडे असलेलं एमडी ड्रग हे कोल्हापुरातून आले आहे, अशी माहिती तपासातून उघड झाली होती. त्याचाच माग काढत अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, सहायक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक पवळे यांची टीम चंदगडजवळच्या ढोलकरवाडी गावात पोहोचली. तेथील एका फार्महाऊसवर हे उत्पादन युनिट असल्याची माहिती होती.राजकुमार राजहंस नावाच्या वकिलाचं ते फार्महाऊस असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोल्ट्री आणि गोटफार्मच्या आड एमडी ड्रग बनवण्याचे काम सुरू होते. जेणेकरुन कुणाला संशय येऊ नये. आरोपी राजकुमार राजहंस हा याच गावाचा रहिवासी आहे. वकिली व्यवसायानिमित्त सध्या मुंबईत राहत होता. जशी गरज पडेल तसे फॅक्टरीत जाऊन एमडी ड्रग्स घेऊन येत होता. मुंबई हे त्याच्या वितरणाचे प्रमुख ठिकाण होते, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
