मुंबई :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले.असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.”
पोलिसांची परवानगी आणि अटी
मुंबई पोलिसांनी सकाळी 9 ते सायं. 6 वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी दिली आहे. मैदानात जास्तीत जास्त 5000 लोकांना उपस्थित राहता येईल आणि केवळ पाच वाहनांना प्रवेश मिळेल, अशी अट ठेवण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 1500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात आहेत.महाराट्रातील विविध भागातून निघालेल्या मोर्चासह हजारो समर्थक मुंबईत दाखल झाले असून रेल्वे व रस्तेमार्गे लोक सतत आझाद मैदानात पोहोचत आहेत. पावसातही अनेकांनी तात्पुरती निवारे उभारली असून प्रशासनाने शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.मोर्चामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. ईस्टर्न फ्रीवे आणि वाशी पुलावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. बेस्टच्या काही बस मार्गांवर सेवा बंद किंवा वळवण्यात आली आहे. ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना
पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे.सदावर्ते यांनी परवानगीतील अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करून जरांगे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. संध्याकाळी 6 नंतर मैदान रिकामे करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जरांगे यांची भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणादरम्यान समर्थकांना भावनिक आवाहन केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, कोणीही जाळपोळ, दगडफेक किंवा दारू पिऊन धिंगाणा घालून आंदोलनाला बट्टा लावू नये; समाजाचं नाव खाली जाणारं कोणतंही कृत्य टाळावं. “मी मरण पत्करायला तयार आहे पण आता मागे हटायचं नाही, मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही,” असे ते म्हणाले. सरकारने सहकार्य केले असल्याने आपणही
संयमाने सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही. कोण राजकीय पोळी भाजतंय किंवा आंदोलनाचा गैरवापर करतंय का हे समाजाने गांभीर्याने पाहावं,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.जरांगे यांनी हे आंदोलन “सुवर्णसंधी” असल्याचे सांगितले. “फक्त एका दिवसाची परवानगी देऊन प्रश्न सुटत नाही. सरकारने ओबीसी आरक्षणात तातडीने समावेश करावा. आम्हाला टिकाऊ, न्यायालयात ठरणारे आरक्षण हवे आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही,” असे ते म्हणाले.

