मुंबई – राज्यातील विविध आरोग्य योजनांचा प्रभावी समन्वय साधण्यासाठी, योजनांतील दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी एकाच छताखाली सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने ‘वॉर रूम’ स्थापन केली आहे.
ही वॉर रूम मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या अनेक योजनांमध्ये माहितीचा अभाव आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही व्यवस्था प्रभावी ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांना या वॉर रूमच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. या माध्यमातून आरोग्य योजनांचे डेटा एकत्रीकरण, लाभार्थ्यांचा केंद्रीकृत नोंदवही तयार करणे आणि अंमलबजावणीवरील देखरेख करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रशासनाचा दावा आहे की या ‘वॉर रूम’च्या माध्यमातून आरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, समन्वित आणि नागरिकाभिमुख होणार आहे.

