महाराष्ट्रात आरोग्य योजनांत मोठा बदल: 2,399 नवे उपचार मंजूर
मुंबई – महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत तब्बल 2,399 नवीन उपचारांना मान्यता देण्यात आली आहे.बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला – पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या अवयव प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र कॉर्पस फंड निर्माण करण्याची मंजुरीही देण्यात आली.नऊ प्रकारच्या प्रत्यारोपण उपचारांचा समावेश आहे.ग्रामीण भागात आरोग्य मित्रांची संख्या वाढवावी आणि तालुकानिहाय रुग्णालयांची मॅपिंग करून खाजगी रुग्णालयांना सुविधा दिली जातील, असे निर्देशही दिले आहेत.
योजनेची माहिती मिळविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप व चॅटबॉट तयार करण्याचे आदेश देखील झाले आहेत, ज्यामुळे लोकांना उपचार, रुग्णालये, लाभांची सविस्तर माहिती सहज मिळेल. कर्करोगाच्या उपचारांसाठी राज्य सरकार नवीन धोरण आणत असून नागपूरमधील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व साईनगर शिर्डीतील अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय बांधणीसाठी निधी देण्यात येईल. या सर्व उपाययोजनांमुळे सामान्य नागरिकांना महागड्या आणि गुंतागुंतीच्या आरोग्य उपचारांमध्ये मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे महागडे उपचार परवडणाऱ्या श्रेणीत आणता येतील आणि गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळेल.

