संघर्ष म्हणजे जीवनातील ती गोष्ट जी आठवताच मनाचा कोपरा ओला होतों ,हि कहाणी तशीच , हौसाबाईंचं बालपण अतिशय कठीण परिस्थितीत द्रारिद्रयत गेलं. त्यांचे आईवडील दगडफोडीचं काम करत असल्याने सतत गावाोगावी फिरावे ,भटकंती करावी लागत असे. लहानपणापासूनच संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. लहान भावंडांची जबाबदारी, घरकाम आणि नंतर आईवडिलांसोबत दगड फोडण्याचं ओझं त्यांनी लहान वयातच उचललं. रात्रंदिवस कष्ट करूनही पोटापुरतं अन्न मिळणंही अवघड होतं.आजी केवळ बारा-तेरा वर्षांच्या असतानाच तिचे लग्न वयाच्या दुप्पट असणाऱ्या व्यक्तीशी लावून दिलं गेलं.
त्यांचा पती व्यसनी आणि तापट स्वभावाचा होते . “तू मला आवडत नाहीस, घरातून निघून जा” अशा शब्दांसह मारहाण करणं ही त्यांची रोजचीच दिनचर्या झाली होती. तरीही आजींनी तग धरला. तीन मुलं आणि दोन मुलींसाठी त्यांनी दुसऱ्याच्या शेतात काम, धुणीभांडी यासारखी कष्टाची कामं करून संसार नेटाने पुढे नेला.सासरी थोडीशी शेती होती, पण भावकीच्या वादामुळे ती हाती आली नाही. वर पतीचं व्यसन वाढलं आणि आजारानं तो मरण पावला. हौसाआजी एकट्या पडल्या, पण मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी दु:खाला पदरात बांधलं.एकेक संकट थांबत नव्हतं. मुलगा अपघातात गमावला. माहेर मायणीत आसरा मिळेल या आशेने त्या चार भांडीकुंडी घेऊन गेल्या, पण तिथेही कुरबुरी सुरू झाल्या. शेवटी स्वतःचा कापडी पाल ठोकून, दिवसा दगडफोडी आणि रात्री धाब्यावर भाकऱ्या बनवणं असं आयुष्य त्यांनी उभं केलं. तिथे काम करताना हिंदी भाषा शिकल्या. मुलांना शाळेत घातलं, पण गरिबीमुळे त्यांनी शाळा अर्ध्यातच सोडली.मोठा मुलगा गवंडीकाम शिकला, मुलींची लग्नं केली. थोडंफार स्थैर्य मिळालं, पण संकट पुन्हा उभं राहिलं. मोठ्या मुलाला ही दारूचं व्यसन लागलं. घरची अवस्था पार बिकट झाली. नातवंडं उपाशी तापाशी राहू लागली. तेव्हा वयाची साठी ओलांडूनही आजी धुणीभांडी करण्यासाठी दहा-बारा घरांत काम करू लागल्या.शिक्षकांच्या सहवासात राहिल्यानं त्यांना शिक्षणाचं महत्त्व उमगलं. “आयुष्यातील अंधार नाहीसा करायचा असेल तर शिकायला हवं” हा धडा त्यांनी मनाशी पक्का केला. नातवंडांना चांगले शिकवण्याचा पक्का निर्धार त्यांनी केला.
हौसा आजींना एक वेगळी ढब होती मन स्वच्छ असल्यामुळे गावातल्या सगळ्यांना न समजणारे प्रश्न विचारणं, चौकशी करणं, बातम्या ऐकणे सांगणं. त्यामुळे लोक त्यांना प्रेमाने “चालता-बोलता मोबाईल” म्हणून चिडवत. पण आजीने कधी काही मनावर घेतलं नाही. उलट, जेवणातून मिळालेला थोडासा शिळा भाग त्या भुकेल्यांना वाटत. कारण पोटाची भूक काय असते, हे त्यांना चांगलं ठाऊक होतं.त्यांच्या नातींनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं, योग्य वयात लग्नं लावून दिली. मोठा नातू सैन्यात भरती होण्यासाठी झटत होता. अनेकदा तो परीक्षेत अपयशी ठरला, पण आजीने त्याला खंबीर साथ आधार दिला. शेवटी त्याचं स्वप्न पूर्ण झालं. तो सैन्यात दाखल झाला, आणि आजीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी सगळ्यांना पेढे वाटले.आज नातवाने छान घर बांधलंय, कुटुंब स्थिर झालंय. आजीला म्हटलं—“आता तुम्ही कष्ट करू नका, निवांत राहा.” तरीही ऐंशी वर्षांपर्यंत त्या काम करत राहिल्या. शेवटी तब्येतीमुळे काम सोडलं. पण ज्या-ज्या घरांत त्यांनी काम केलं, त्या सगळ्या कुटुंबांशी त्यांचा आजही जिव्हाळ्याचा संबंध आहे.आजींचं आयुष्य हे संघर्षातून उभं राहिलेलं प्रेरणादायी जीवन आहे.. हि आजी प्रत्येकाच्या घरी आहे .जुन्या लोकांनी खूप भोगले ,काळ बदलला व कालानुरूप संघर्ष ही .


mast ahe Story