राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; चालक अटकेत, दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला
ठाणे, ४ सप्टेंबर — दारूमुळे अनेकांचे संसार रसातळाला गेले आहे मात्र आर्थिक गणित व सरकारी नियम यांची सांगड बसवत,नियम तोडून सर्वत्र दारू व्यवसाय चालू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने खारेगाव परिसरात सापळा रचून गोव्यातून आणण्यात येणाऱ्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) तस्करीवर कारवाई केली. यामध्ये सुमारे १,४०० बॉक्स आणि टेम्पो मिळून अंदाजे ₹१.५६ कोटींचा मुद्देमाल जप्त झाला असून, चालकाला अटक करण्यात आली आहे.
कारवाईचा तपशील
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पथकाने टेम्पो अडवला. तपासणीदरम्यान वाहनातून गोव्यात निर्मित IMFLचे बॉक्स आढळले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹१,५६,६३,८०० असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
चालकाची ओळख मोहम्मद समशाद सलमानी अशी असून, त्याला अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या मोहिमेत निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी यांच्या पथकाने अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
अलीकडच्या काळात गोवा–महाराष्ट्र सीमावर्ती मार्गांवरून मद्यतस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर भागात १,८६६ बॉक्स जप्त झाले होते. त्याआधी ठाण्यातील पथकाने ८०० बॉक्स जप्त करून समान कारवाई केली होती.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गोव्यातील कररचना व किंमती कमी असल्याने तेथे खरेदी केलेले मद्य महाराष्ट्रात अधिक किमतीत विकले जाते. त्यामुळे तस्करांना मोठा नफा मिळतो.
कायदेशीर स्थिती
प्रकरण महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत नोंदवले असून, पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. पोलीस विभागाने नागरिकांना बेकायदेशीर मद्यनिर्मिती व वाहतूक याबाबत माहिती असल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे,कळवण्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.

