मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय येथे ‘वंदे मातरम्’ गीताच्या शताब्दी महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण करण्यात आले. हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक मानले जाते. 7 नोव्हेंबर 2025 रोजी या गीताला 150 वर्ष पूर्ण होणार आहेत.या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आकाश फुंडकर, मंत्री अतुल सावे आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.
राज्यभर कार्यक्रम:
प्रत्येक तालुक्यात ‘वंदे मातरम्’चे समूहगान आयोजित केले जाणार आहे. यासोबतच कौशल्य विद्यापीठे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये व देशभर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
बोधचिन्ह डिझाईन स्पर्धा:
मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयातील तज्ज्ञ परीक्षकांनी ऑनलाईन बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेत सहभागी झालेल्या 350 स्पर्धकांपैकी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे प्रा. रवी पवार यांनी तयार केलेले डिझाईन अंतिम निवडले. राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
‘वंदे मातरम्’ गीत हे भारतीय राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. या महोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुका आणि शहरात आयोजित केले जाणारे कार्यक्रम या गीताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला उजाळा देतील.

