नाशिक – नाशिक जिल्ह्यात शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळपासून मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असून, जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब भरली आहेत. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. हवामान खात्यानं आज (रविवार) नाशिकला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.गंगापूर धरणातून ५,३२८ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरी नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचलं आहे. परिणामी पंचवटीतील रामकुंड परिसरातील लहान-मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचल्याचं दृश्य नागरिकांनी अनुभवले. प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
१४ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत १४ हजार हेक्टरवरील पिकं पावसामुळे बाधित झाली असून, ६५ गावांतील २० हजारांहून अधिक शेतकरी संकटात आले आहेत.
- कापूस – ५,११९ हेक्टर
- कांदा – १,७५३ हेक्टर
- मका – ४,६३१ हेक्टर
मालेगाव, नांदगाव, येवला आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं प्राथमिक अंदाज आहे.मालेगाव तालुक्यातील माळगाव येथे समाधान वाकळे (वय १६) हा तरुण मेंढ्या चारताना विजेच्या झटक्यामुळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, या घटनेत दहा मेंढ्या ठार झाल्या.
या धरणांमधून सुरू आहे पाण्याचा विसर्ग
- दारणा – १,९०४ क्युसेक
- गंगापूर – ५,३२८ क्युसेक
- वालदेवी – ६२ क्युसेक
- नांदूर मध्यमेश्वर – १९,००० क्युसेक
- आळंदी – २४३ क्युसेक
- करंजवन – १,९५५ क्युसेक
प्रशासनाचा इशारा
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रशासनानं नाशिककरांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू ठेवली आहे.

