मुंबई : आपली मुंबई सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. 2022 पासून निवडणुका प्रलंबित आहेत आणि या वेळी ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. अलीकडेच शिंदे गटाने प्रभागनिहाय प्रभारी प्रमुखांची नियुक्ती केली होती.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) पक्षाची धोरणे आणि रणनीती ठरवण्यासाठी 21 सदस्यांची ‘मुख्य कार्यकारी समिती’ जाहीर केली आहे. या समितीमध्ये पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते, खासदार आणि आमदार यांचा समावेश आहे. पालिकेवर पक्षाला यश मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असल्याचे या समितीच्या स्थापनेतून दिसून येत आहे.शिंदे गटाने जाहीर केलेल्या या समितीमध्ये अनुभवी आणि युवा नेत्यांचा समन्वय साधण्यात आला आहे. समितीमध्ये मुख्य नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आहेत. त्यांच्यासोबत रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ आणि मीनाताई कांबळे हे ज्येष्ठ नेतेही आहेत.या समितीमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा (राज्यसभा), राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांचा समावेश आहे. तसेच, आमदार प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुरजी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर आणि मनीषा कायंदे (विधान परिषद) यांनाही स्थान मिळाले आहे. याशिवाय, माजी आमदार सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत आणि शिशिर शिंदे यांचाही समितीत समावेश आहे.

