धाराशिव, बीड, परभणी सर्वाधिक प्रभावित; १८ लाख हेक्टर शेतजमीन जलमय
राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले आहे.मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ६७ गावांचा बाहेरील संपर्क तुटला आहे. शेतजमीन व जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एनडीआरएफ आणि आर्मीचे पथक सतत बचावकार्यात गुंतलेले आहे.
मुसळधार पावसाने कहर
मराठवाडा, जळगाव, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाने मोठा धुमाकूळ घातला.
- पूरस्थितीमुळे शेकडो घरे कोसळली, रस्ते वाहून गेले आणि काही तलाव फुटले.
- १८ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन पाण्याखाली गेली असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- आतापर्यंत १५० हून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडल्याची नोंद झाली आहे.
बचावकार्य तीव्र
धाराशिव जिल्ह्यातील वाघेगव्हाण येथे सुमारे १५० लोक पूराच्या पाण्यात अडकले होते. आर्मी व एनडीआरएफच्या जवानांनी हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे.राज्य प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, बचाव कार्य वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

