“ शिंदेंची घोषणा – पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आणि महायुती सरकार ठाम.”
मुंबई : गोरेगावच्या नेस्को संकुलात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करतानाच बळीराजाला दिलासा देणारी महत्त्वाची आश्वासने जाहीर केली. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही” अशी ग्वाही देत त्यांनी शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं आवाहन केलं.
शिंदे यांनी ठाकरेंवर तीव्र शब्दात टीका केली.
- “ते पक्षप्रमुख नाहीत, तर कटप्रमुख आहेत” असा हल्ला चढवत, स्वतःच्या कार्यकर्त्यांवरच कारस्थान केल्याचा आरोप केला.
- “30 वर्षे मुंबई महापालिका तुमच्या हाती होती, मग एवढी माया कुठं गेली? लंडनला का?” असा थेट सवाल उपस्थित केला.
- कोरोनाकाळात जमा झालेल्या 600 कोटी रुपयांपैकी एक रुपयाही लोकांवर खर्च केला नाही, असा आरोप करून ठाकरेंवर कडाडून टीका केली.
- “फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर केवळ दिखावा करण्याचा टोला लगावला.
शेतकऱ्यांना दिलासा
एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत म्हणाले की, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तुम्हाला मदत दिवाळीपूर्वी मिळेल, हा माझा शब्द आहे.” त्यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा गुरुमंत्र सांगत संकटात शिवसेना सदैव धावून जाते, असेही सांगितले
- “पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी त्यांना मदत मिळेल, हा शिंदेचा शब्द आहे” अशी ग्वाही.
- “बळीराजाच्या मुलामुलींची लग्नं जर या आपत्तीमुळे रखडली असतील, तर त्याची जबाबदारी शिवसेना घेईल” अशी महत्त्वाची घोषणा.
- “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मार्ग आहे. त्याच मार्गावर आम्ही चाललो आहोत” असे प्रतिपादन.
- शेतकऱ्यांना धीर देत “टोकाचं पाऊल उचलू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे” असेही आश्वासन.
दसरा मेळाव्याची वैशिष्ट्ये
- पूरस्थिती लक्षात घेऊन यंदाचा मेळावा मुंबई-ठाण्यापुरता मर्यादित ठेवण्याचा निर्णय.
- माजी आमदार राजन तेली आणि अण्णासाहेब माने यांचा शिंदे गटात प्रवेश.
- धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष सुरू करण्यात आला.
- बाळासाहेब ठाकरे यांच्या 2026 जयंती वर्षाचा मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करण्याची घोषणा.
इतर नेत्यांचे भाषण
- रामदास कदम : “उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या चरणी ठेवली, पण शिंदेंनी पुन्हा हिंदुत्वाच्या मार्गावर आणली”. तसेच बाळासाहेबांच्या निधनानंतरच्या मृत्यूपत्रावर प्रश्न उपस्थित करत “उद्धवांना मुंबईतून हद्दपार केलं पाहिजे” असंही मत मांडलं.
- गुलाबराव पाटील : “आम्ही नकली नाही, असली आहोत”. राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेविरोधात उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली नाही, असा आरोप. तसेच “जळगाव जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 25 लाखांची मदत” जाहीर केली.


