मुंबई – वरळीतील कामगार वसाहतीमध्ये एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात चार जण भाजले. या भाजलेल्यांना मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे उपचार न मिळाल्याने त्यापैकी तीन जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका ४ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा निषेध करत पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवी करावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.वरळी येथे काल (बुधवार) सिलेंडर स्फोट झाला. यात आनंद पुरी (वय 27), विद्या पुरी (वय 25), विष्णू पुरी (वय 5) आणि इतर एक असे ४ जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांची असंवेदनशीलता आणि हलगर्जीपणा ( Doctor’s Negligence ) यामुळे या जखमींना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील एका लहान ४ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेचा आणि नायर रुग्णालयातील असंवेदनशीलतेचा भाजपा निषेध करत आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच या मुलाचा मृत्यू झाला. भाजपा या घटनेची सखोल चौकशीची मागणी करत आहे तसेच आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याची विनंती करत आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.रुग्णालयात संबंधित रुग्णांवर उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचे आरोप करणारी चित्रफित निदर्शनास आली असून त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयाचे उप अधिष्ठाता या प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशीअंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

