फलटण :राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम उत्तर दिले आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना कायम राहणार असून लाभार्थिनींना नियमित मदत मिळत राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली होती. राज्यभरातून तब्बल २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज केले. तपासणीअंती २ कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत.अलीकडेच विरोधकांनी “निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजना थांबवली जाणार” असा दावा केला होता. त्यावर फडणवीस यांनी फलटण येथील सभेत भाष्य केले.
फडणवीस यांचे स्पष्ट प्रतिपादन
फडणवीस म्हणाले, “महायुती सरकारने जाहीर केलेल्या कोणत्याही योजना बंद करायच्या नाहीत. विरोधकांना फक्त भीती दाखवायची आहे. पण लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आमचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही पाच वर्षांनी रिन्यू केलं तर आणखी पाच वर्षे सवलती मिळतील.”
त्यांच्या मते, ही योजना केवळ राजकीय नाही तर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे.
या कार्यक्रमात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा केली. “आमचं सरकार विकासाच्या विचाराने चालणारं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आलं आणि इतिहासातील सर्वात मोठं ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मदतीची प्रक्रिया सुरू झाली आहे,” असे ते म्हणाले.

