कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पूर्व) परिसरात मोठा सिमेंट घोटाळा उघडकीस आला आहे. लोकग्राम येथील एका गोदामातून नामांकित ब्रँडच्या नावाखाली भेसळयुक्त सिमेंट विक्री होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या गोदामात बनावट सिमेंट भरून बाजारात विक्री केली जात होती.काही जागरूक नागरिकांनी या संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि तिथून चार ट्रकसह लाखो रुपयांचे निकृष्ट सिमेंट जप्त केले.
पोलिसांनी सांगितले की, सिमेंटच्या मूळ बॅगांमध्ये बनावट दर्जाचे सिमेंट भरून ते विक्रीसाठी पाठवले जात होते.प्राथमिक तपासानुसार हा गोरखधंदा नरेश मिश्रा यांच्या गोदामात चालत होता. या व्यवसायामागे उल्हासनगरमधील नवीन भाटिया नावाचा व्यक्ती असल्याची माहिती कामगारांनी पोलिसांना दिली आहे.
या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाचा फोकस या साखळीतील इतर पुरवठादार आणि विक्रेत्यांकडे आहे.बनावट सिमेंटचा वापर हा केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर लोकांच्या जीवाशी खेळ आहे. निकृष्ट दर्जाच्या सिमेंटमुळे इमारतींची मजबुती कमी होते आणि बांधकाम कोसळण्याचा धोका वाढतो.
तज्ञांच्या मते, अशा सिमेंटचा वापर केल्याने पायाभूत रचना टिकत नाहीत, आणि दीर्घकाळात मोठी जीवितहानी होऊ शकते.
पोलीस काय म्हणतात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायींदे यांनी सांगितले की,
“या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार ट्रकसह लाखो रुपयांचे सिमेंट जप्त केले असून, पंचनामा करून तपास सुरू आहे.”
तपासात अजून काही मोठ्या बिल्डर किंवा पुरवठादारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.बांधकाम क्षेत्रातील भ्रष्ट प्रथांचा आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याच्या वाढत्या वापराचा गंभीर नमुना आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जागरूक राहणे, खरेदी करताना ब्रँडची खात्री करणे आणि संशयास्पद व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अत्यावश्यक आहे.

