पुणे | ग्रामशासन प्रतिनिधी पुण्यातील बावधन परिसरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून एका २१ वर्षीय तरुणीचे बनावट अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर पसरवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबईतील विरार येथे राहणाऱ्या चिराग राजेंद्र थापा (वय २१) या तरुणाला अटक केली आहे.
पीडित तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहे. ‘बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI)’ या ऑनलाइन गेममधून तिची ओळख आरोपीशी झाली. खेळाच्या निमित्ताने संपर्क वाढला आणि नंतर आरोपीने स्नॅपचॅट व इंस्टाग्रामवरून तिला डेटवर येण्यास आणि मैत्रीण होण्यास सांगितले.तरुणीने प्रस्ताव नाकारताच आरोपी संतापला. त्याने सूड म्हणून तरुणीच्या नावाने तब्बल १३ बनावट इंस्टाग्राम खाती तयार केली आणि सतत धमक्या देऊ लागला.AI चा वापर करून तयार केले बनावट फोटोत्याने पुढे जाऊन AI च्या मदतीने तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो तयार केले आणि ते तरुणीच्या कुटुंबीयांना, मित्रांना व मैत्रिणींना पाठवले. एवढेच नव्हे, तर तिच्या मैत्रिणींचेही बनावट फोटो तयार करून पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला — “माझा प्रस्ताव मान्य कर, नाहीतर फोटो व्हायरल करीन” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या.
तक्रार आणि पोलिसांची कारवाई
या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढला आणि त्याला कर्जत येथून अटक केली.
त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अशा प्रकारचे AI आधारित मॉर्फिंग आणि डिजिटल ब्लॅकमेलिंगचे प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरात याआधीही समोर आले आहेत. पोलिसांच्या मते, AI तंत्रज्ञान जितके उपयुक्त तितकेच धोकादायकही ठरू लागले आहे.“सोशल मीडिया खात्यांवरील फोटो सहज उपलब्ध असल्याने त्यांचा गैरवापर रोखणे ही सायबर विभागासाठी नवी लढाई ठरते,” असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

