नवरात्रीच्या शुभारंभी मोदींनी दिल्या शुभेच्छा; जीएसटी बचत महोत्सव आणि मंदिर विकासकामांचे उद्घाटन
नवी दिल्ली – देशभरात नवरात्रीचा उत्सव आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा देत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. त्यांनी सोशल मीडियावरून संदेश देताना “नवरात्रीचा पवित्र काळ हा आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक बळकट करण्याची वेळ आहे,” असं नमूद केलं.
मोदींनी या सणाला धैर्य, संयम आणि दृढनिश्चयाचं प्रतीक ठरवत नागरिकांच्या जीवनात नवचैतन्य, सौभाग्य आणि आरोग्य नांदो, अशी प्रार्थना व्यक्त केली. पहिल्या दिवशी माँ शैलपुत्री पूजेचं महत्त्व अधोरेखित करत त्यांनी आईच्या कृपेमुळे नागरिकांना कल्याण लाभो, असा विश्वास व्यक्त केला.
जीएसटी बचत महोत्सव आणि स्वदेशी मंत्र
पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी ‘जीएसटी बचत महोत्सव’ हाही उपक्रम जाहीर केला. सरकारच्या नव्या जीएसटी दरांमुळे दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्याचं सांगत त्यांनी नागरिकांना भारतीय उत्पादने खरेदी करण्याचं आवाहन केलं. मोदींच्या मते, हे केवळ खरेदी नव्हे तर स्वावलंबी भारताच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरेल.
नवरात्रीच्या शुभारंभी मोदी त्रिपुराच्या दौर्यावर आहेत. तेथे त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलाच्या विकासकामाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जातील.यानंतर मोदी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरातील विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. इटानगरमध्ये तब्बल ५,१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला जाईल. हे प्रकल्प ऊर्जा, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास क्षेत्राशी संबंधित आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, हे उपक्रम ईशान्य भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरतील.
पंतप्रधानांनी सांस्कृतिक संदेशालाही महत्त्व दिलं. त्यांनी पंडित जसराज यांचं एक भजन सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांना स्वतःची आवडती किंवा स्वतः गायलेली भजने पाठवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी आश्वासन दिलं की ही भजने ते पुढील काही दिवसांत शेअर करतील.

