Breaking
28 Oct 2025, Tue

“कांदा शेतकऱ्यांचे राज्यव्यापी फोन आंदोलन; हमीभावाची मागणी तीव्र”

नाफेड-एनसीसीएफकडून बफर स्टॉक बाजारात आल्याने भाव पडले; शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी तीव्र

नाशिक — शेतकरी नैसर्गिक संकटाना तोंड देतच असतो नियोजित व्यवस्थेमुळे जर शेतकरी जाणीपूर्वक अडचणीत येत असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही .कांद्याच्या सततच्या दरकपातीमुळे राज्यातील शेतकरी संतापले असून, आजपासून सलग सात दिवस राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू झाले आहे. शेतकरी थेट राज्यातील लोकप्रतिनिधींना फोन करून “कांद्याला हमीभाव द्या” अशी मागणी करणार आहेत.

कांद्याचे भाव कोसळले

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ नाशिक जिल्ह्यात आहे. उत्पादन घेतलेला कांदा देशभरात तसंच विदेशात निर्यात केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्यानं कांद्याच्या दरात होत असलेली घसरण, त्यात नाफेड आणि एनसीसीएफकडून कांद्याचा बफर स्टॉक बाजारात दाखल झाल्यानं कांद्याचे भाव कोसळलेत. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील कांदा चाळीत अद्याप ३०% कांदा शिल्लक असूनही बाजारात भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. उत्पादन खर्च क्विंटलमागे २,००० रुपये असूनही बाजारभाव फक्त १,००० रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नाफेड आणि एनसीसीएफने काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला बफर स्टॉक बाजारात सोडल्याने भाव कोसळले आहेत.

सरकारने बफर स्टॉक म्हणून साठवलेला कांदा रेशन दुकानातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपलब्ध करून द्यावा त्याला आमचा विरोध नाही. याशिवाय उरलेला कांदा हा समुद्रात फेकून द्या, अन्यथा जमिनीत खड्डा करून पुरून टाका. मात्र, हा कांदा बाजारात येता कामा नये. अन्यथा आम्ही नाफेड आणि एनसीसीएफचे कांद्याचे कंटेनर्स आणि ट्रक डिझेल टाकून पेटवून देऊ असं रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी म्हटलंय.

“कांद्याच्या लागवडीला एकरी ७० ते ८० हजार खर्च येतो. मजुरी, पाणी, वाहतूक सगळं महाग झालं आहे. आता कांद्याला केवळ १०–११ रुपये किलो भाव मिळतोय. आम्हाला हमीभाव न दिल्यास इच्छा मरण द्यावं,” अशी मागणी चांदवडचे शेतकरी मनोज पाटील यांनी केली.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या माहितीनुसार, फोन आंदोलनादरम्यान शेतकरी सात दिवस सतत लोकप्रतिनिधींना फोन करून कांद्याच्या भावाबाबत प्रश्न विचारतील ,अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे  यांनी दिली

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

One thought on ““कांदा शेतकऱ्यांचे राज्यव्यापी फोन आंदोलन; हमीभावाची मागणी तीव्र””

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *