मुंबई :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लाभार्थी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील तब्बल 2 कोटी 40 लाख लाभार्थ्यांपैकी केवळ 80 लाख महिलांचीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.सरकारने 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत दिली असली तरी, या प्रक्रियेत मंद गती आणि सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या कायम आहेत.गेल्या दीड महिन्यापासून लाभार्थ्यांना ई-केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. वेबसाइट उघडत नाही, सर्व्हर वारंवार बंद पडतो, तसेच नेटवर्क समस्येमुळे प्रक्रिया थांबते, अशी तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, “या अडचणींवर लक्ष ठेवले जात आहे. पुढील आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक तो निर्णय घेतला जाईल.”
अर्जदार महिलांमध्ये संभ्रम
सरकारने नुकतेच ई-केवायसी प्रक्रियेत काही नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार अर्जदार महिलांना पती किंवा वडिलांचे कागदपत्र (आधार, पॅन किंवा उत्पन्नाचा दाखला) जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.मात्र ज्या महिलांचे पती आणि वडील दोघेही हयात नाहीत, अशा अर्जदार महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी मंत्रालयाकडे पोहोचल्या आहेत. “या समस्येवर उपाय शोधण्याचे काम सुरू असून लवकरच तोडगा निघेल,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.या योजनेत सुरुवातीपासूनच काही गैरप्रकार उघड झाले आहेत. काही ठिकाणी एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक अर्ज दाखल करण्यात आले होते. तर काही पुरुषांनीही महिलांच्या नावाने अर्ज करून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
याशिवाय सुमारे सात हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही योजना लाभ घेतला असल्याचे विभागीय तपासात उघड झाले आहे. त्यामुळे संबंधितांकडून रक्कम वसूल करावी का, यावर सरकार विचार करत आहे.महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप वाढीव रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांना सकाळी आणि रात्रीच्या वेळी ई-केवायसी प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे, कारण त्या वेळेत सर्व्हर स्थिर राहतो. मात्र उर्वरित दीड कोटींपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी 18 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण कशी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

