दुबई, 15 सप्टेंबर : आशिया कप 2025 मधील भारत–पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने सात विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या वाढदिवशीच विजयी षटकार ठोकून सामना जिंकवला आणि भारताला सुपर-4 फेरीकडे जवळपास नेले.
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने दुबईहून संदेश देत पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने हा विजय भारतीय लष्कराला समर्पित केला.
“देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या शौर्यानेच आम्हाला प्रेरणा मिळते,” असे यादवने सांगितले.
एप्रिल महिन्यातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याविषयी भारतात मोठा विरोध होता. सामना खेळवावा की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र अखेरीस सामना खेळवण्यात आला आणि भारताने सहज विजय मिळवला.
हस्तांदोलन टाळले, पाकिस्तानी खेळाडू निराश
क्रिकेटमधील परंपरेनुसार सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हस्तांदोलन करतात. मात्र, भारतीय खेळाडूंनी यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंग रूमकडे मार्गक्रमण केले. पाकिस्तानचे खेळाडू रांगेत उभे राहिले, पण भारतीय संघाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू निराश होऊन मैदानाबाहेर गेले.
सामन्याची आकडेवारी
- पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 127 धावा केल्या.
- भारताने लक्ष्याचा पाठलाग फक्त 16 व्या षटकात तीन विकेट्स गमावत पूर्ण केला.
- सूर्यकुमार यादवने झळाळत्या फलंदाजीने विजयात निर्णायक भूमिका बजावली.
भारताची कामगिरी
याआधी भारताने यूएईवर नऊ विकेट्सने विजय मिळवून मोहिमेची दमदार सुरुवात केली होती. पाकिस्तानने ओमानवर मात करून स्पर्धेत प्रवेश केला होता, पण भारताच्या दबदब्यासमोर टिकता आला नाही.हा सामना जिंकून भारतीय संघाने आशिया कपच्या सुपर-4 फेरीकडे वाटचाल केली असून कर्णधार सूर्यकुमार यादवची सामन्यानंतरची भावनिक प्रतिक्रिया देशवासियांच्या हृदयाला भिडली आहे.

